नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : थॅलेसेमिया, सिकलसेल, ॲनिमिया या आजारांसाठी उपयुक्त असलेल्या फोर्टीफाईड तांदुळाविषयी जनसामान्यांना उद्भवलेल्या शंकाचे निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळा आज संपन्न झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, भारतीय खाद्य निगमचे उपमहाप्रबंधक अर्धदिपराय, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. एम. बावा, केंद्र शासनाच्या अन्न मंत्रालयाचे एस.ओ अविक भट्टाचार्य, सलीम दिवाण, स्टेट लिडर निलेश गंगावरे आदी उपस्थित होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील  मार्गदर्शन करतांना म्हणाले की, फोर्टिफाईड तांदुळाची माहिती जनसामान्यांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेच्या माध्यमातून आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य कर्मचारी तसेच रेशन दुकानदारानी फोर्टीफाईड तांदुळाची माहिती जनसामान्यामध्ये पोहचवावी. जिल्ह्यात सिकलसेल, ॲनामियाचे रुग्ण असल्याने रक्तामधील लोहाची कमतरता भरुन काढण्यासाठी हे तांदुळ पौष्टिक असून या तांदुळाचा वापर कसा करावा याबद्दल स्थानिक भाषेत जनजागृती करुन फोर्टिफाईड तांदुळाचे महत्व सांगावे असे त्यांनी सांगितले.

श्री.शेलार म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांना फोर्टिफाईड तांदुळाचे वाटप करण्यात येत आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा नियमित तांदळासारखाच असून या तांदुळामध्ये फोर्टिफाईड तांदुळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात असते. लहान मुले, गर्भवती मातांच्या आहारामधील सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याकरिता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येतो. हा तांदुळ पोषक घटकांचा वापर करुन बनविण्यात आला असून या तांदुळामध्ये लोहखनिज, फोलिक ॲसिड विटामीन बी चे प्रमाण असल्यामुळे अधिकची पोषकतत्वे या तांदुळातून मिळतात. प्रक्रियायुक्त फोर्टिफाइड तांदुळाचे वजन नियमित तांदुळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदुळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसून येतो. हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आल्यास गैरसमज करू नयेत. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजवावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपध्दती अवलंबण्याची आवश्यकता नाही असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. अविक भट्टाचार्य, सलीम दिवाण, निलेश गंगावरे यांनी फोर्टिफाईट तांदुळ तयार करण्याच्या पद्धती तसेच  तांदळाच्या महत्वा विषयी माहिती दिली. या कार्यशाळेला तालुका वैद्यकीय अधिकारी, रेशनदुकानदार तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.