नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशभरात आता ३ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याबाबतची मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी केली जाईल. आपल्या देशात करोनाचे ५५० रुग्ण होते, तेव्हाच आपण २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा संकल्प केला. इतर देशांच्या तुलनेत चांगलं काम केल्यामुळेच परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा १४ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. केंद्र सरकारकडून नवीन लॉकडाऊनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली जाणार आहे. सर्व वर्गांचा विचार करुन लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशवासियांकडून पंतप्रधान मोदी यांनी सात मुद्द्यांवर साथ मागितली आहे.
या सात गोष्टींवर मागितली साथ
घरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या, ज्यांना अगोदरच आजार असतील त्यांची आणखी काळजी घ्या. त्यांना करोनापासून वाचवा. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं काटेकोर पालन करा. घरात तयार मास्कचा वापर करा. स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाटी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोष्टी करा. करोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड करा आणि इतरांनाही याबाबत सांगा. शक्य तेवढं गरीब कुटुंबाची देखरेख करा आणि जेवणाची काळजी घ्या. तुमचा व्यवसाय आणि उद्योगात तुमच्यासोबत काम करत असलेल्या सहकाऱ्यांविषयी सहवेदना ठेवा, त्यांना कामावरुन काढून टाकू नका. देशातील करोना युद्धातील डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, पोलीस या सर्वांचा आदर करा, अशा सात गोष्टींसाठी साथ हवी असल्याचंही मोदी म्हणाले. विजय मिळवण्यासाठी ही सप्तपदी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

१. घरातील ज्येष्ठांची जास्त काळजी घ्या
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन३. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचे पालन
४. आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड करा
५. शक्य तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या
६. व्यवसायिक, उद्योजकांनी कामगारांना नोकरीवरुन काढू नका
७. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता दूत, पोलिसांचा सन्मान करा.