नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात ग्रामीण भागातील मोठ्या गावात एकही कोरोना बाधित आढळल्यास त्या संपूर्ण परिसरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी आणि त्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील आणि परिसरातील सर्व नागरिकांचे स्वॅब संकलन करण्यात यावे. प्रत्येक 15 दिवसांनी व्यावसायिक, फेरीवाले, भाजी आणि फळ विक्रेत्यांची अँटीजन चाचणी करण्यासाठी विशेष मोहिम घेण्यात यावी. संपर्क साखळीतील एकही व्यक्ती चाचणीपासून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी.   उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयातील तापाच्या रुग्णांचेदेखील स्वॅब घ्यावेत.

जिल्ह्यात लसींचा पुरेसा पुरवठा असल्याने दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या लसीकरणासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. लसीकरण  शिबीर आयोजित करताना लसींच्या उपलब्धतेसाठी जिल्हा यंत्रणेसाठी समन्वय ठेवावा आणि दुर्गम भागात अधिक शिबिरांचे आयोजन करावे. वॉर्डनिहाय आणि गावनिहाय याद्या तपासून कमी लसीकरण असलेल्या  गावात विशेष मोहिम राबवावी. डीएम फेलोज, बचत गटांचे सदस्य यांचा उपयोग जनजागृतीसाठी करण्यात यावा.

रुग्णवाहिकांचा उपयोग अधिक गरज असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राधान्याने करण्यात यावा. बाईक ॲम्ब्युलन्ससाठी चालकांना प्रशिक्षण देण्यात यावे. म्यूकर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे सुरू करण्यात यावी.

श्री.गावडे म्हणाले, कोरोना बाधितांची संख्या  कमी होत असतानाही कोविड केअर सेंटरची यंत्रणा सज्ज ठेवावी. लसीकरणासाठी मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यात यावे. सुटीच्या दिवसातही स्वॅब संकलन आणि लसीकरण मोहिमेची गती कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनरेगा अंतर्गत घरकूलांची कामे वेगाने पूर्ण करावी.