नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत काही शिथीलतेसह लॉकडाऊन सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार 5 ऑगस्ट पासून मॉल आणि व्यावसायिक संकुले निर्धारीत वेळेत सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे.

चित्रपट गृह सुरू करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. मॉल आणि व्यावसायिक संकुल (मार्केट कॉम्प्लेक्स), दुकाने, आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यांतर्गत बससेवा ही जास्तीत जास्त 50 टक्के प्रवाशी क्षमतेने राहणार असून आंतरजिल्हा बससेवेबाबत शासनाकडून  सूचना आल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. आंतरराज्य बससेवादेखील बंद राहील. औषधांची दुकाने आणि खाजगी रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील.

सर्व मंगल कार्यालय,लॉन्स,विना वातानूकूलीत हॉल्स हे 23 जून रोजीच्या आदेशाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी असेल. वृत्तपत्र छपाई व वृत्तपत्र विक्रेत्यांना मुभा असेल. सर्व बार्बर शॉप, स्पा,सलुन्स, ब्युटी पार्लर, हे 25 जून रोजीच्या आदेशाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

जलतरण तलाव वगळता मैदानी खेळ जसे गोल्फ, फायरींग रेंज, जीमॅटीक्स, टेनीस, बॅटमींटन आणि मल्लखांब यांना सामाजीक अंतर आणि सॅनिटायझेशन करण्याच्या अटीवर मुभा असेल.

रिक्शासाठी वाहनचालक आणि इतर दोन प्रवासी, चारचाकी वाहनासाठी  वाहनचालक व इतर तीन प्रवासी आणि दुचाकी वाहनावर चालक आणि सहप्रवाशास अनुमती असेल. दूचाकीवर  मास्क आणि हेल्मेट घालणे आवश्यक राहील.

विविध बाबीसाठी दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे. जिल्ह्यातील शहरी भागात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू बाबत काढलेला आदेश लागू राहणार आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.