नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जीम व व्यायामशाळा सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. जीम व व्यायामशाळेच्या ठिकाणी कोविड-19 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

जीम व व्यायामशाळेत कमीत कमी 6 फूट अंतर राखणे पाहिजे. जीम, व्यायामशाळा व परिसरामध्ये मास्क व सॅनिटायझर वापर करणे आवश्यक राहील. खोकतांना किंवा शिंकताना नाक पूर्ण झाकले जाईल यांची खबरदारी घेणे बंधनकारक राहील. व्यायाम परिसरामध्ये थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. सर्वांना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे बंधनकारक असेल. येथे येणाऱ्यांनी स्वत:ची आरोग्य निरीक्षणे करणे व आजारी असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनास कळविणे बंधनकारक असेल.

जीम व व्यायामशाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीस 4 चौ.मीटरवर आधारीत मजला क्षेत्राचे नियोजन करावे. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने उपकरणे किमान 6 फूट अंतरावर ठेवावीत. श्वासाची गती वाढविणाऱ्या व्यायामासाठी असलेल्या उपकरणादरम्यान 12 फूट अंतर राखले जावे. संपर्क न येणाऱ्या ऑनलाईन पेमेंट सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छ हवा आत येण्यास जागा असावी व वातानुकूलन उपकरणांचे तापमान 24 ते 30 डिग्री सेल्सिअस असावे. कचराकुंडी नेहमी झाकलेली असावी. लागू असेल तिथे स्पा, सौना, स्टीम बाध व जलतरण तलाव बंद राहतील.

65 वर्षांवरील नागरिक, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांखालील मुलांना जीम , व्यायामशाळेच्या परिसरात व्यायाम करता येणार नाही. जीम, व्यायामशाळा सुरु करणेपूर्वी योग्य प्लेसमेंट किंवा उपकरण तसेच व्यायामशाळा  आणि परिसर निर्जतुकीकरणे करणे बंधनकारक राहील. सदस्य आणि कर्मचारी यांना व्यायामाचे उपकरण, व्यायामापूर्वी आणि नंतर निर्जतुकीकरण करणे बंधनकारक असेल. जीम व व्यायामशाळेत कर्मचारी आणि सदस्य याची संख्या कमीत कमी असावी. सामाजिक अंतर राखण्यासाठी कर्मचाऱ्यांची शिफ्ट आणि उपस्थिती सुनिश्चित करावी.

जीम, व्यायामशाळेमध्ये प्रवेश करतांना प्रवेश द्वाराजवळ सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंगची सोय करावी. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींना प्रवेश असेल.जीम, व्यायामशाळेमध्ये प्रवेश करणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या सर्व सदस्य आणि  अभ्यागताची नोंदणीसाठी स्वंतत्र नोंदवही ठेवावी.

जीम, व्यायामासाठी सर्वासाठी एकत्र असलेल्या मॅटचा वापर टाळावा यासाठी सदस्यांना त्यांची स्वंतत्र मॅट आणण्यास सूचित करावे. कोविड 19 संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता शक्य तेथे संगीत, गाणी वाजवली जाऊ शकतात. परंतु ओरडणे, हास्य योगा यांना परवानगी असणार नाही.  जीम, व्यायामशाळा बंद करणेपूर्वी शॉवर रुम, लॉकर, चेंजिंग रुम,वॉशरुमचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहील.

व्यायाम करताना व केल्यानंतर कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वापरलेले टिश्यू पेपर व फेस मास्कची योग्य विल्हेवाट लावावी. जीम किंवा व्यायामशाळेत आलेल्या आजारी व्यक्तीची माहिती  जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. अशी व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळल्यास संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.