नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन 5 नोव्हेंबर पासून  जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, योग प्रशिक्षण केंद्र, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळांना सुरू करण्याची सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे.

राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.

            प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुन:श्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.

            बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर 5 नोव्हेंबर पासून मुभा देण्यात आली आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स यांनाही 50 टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्य पदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.

मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकारी त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येत आहे.

हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.