नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर करून मास्कचे दर निश्चित केले आहेत. आता एन 95 मास्क  19 ते 49 रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे.

विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे. ही अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील.

एनआयओएसएच सर्टीफाईड एन-95 व्हीशेप मास्क 19 रुपये, एन-95 थ्रीडी मास्क 25 रुपये, एन-95 व्ही विदाऊट वॉल्व्ह 28 रुपये, मॅग्नम एन-95 एमएच कप मास्क 49 रुपये, व्हीनस सीएन एन-95 प्लस कप शेप मास्क विदाऊट वॉल्व्ह 29 रुपये, व्हीनस-713 डब्ल्यु-एन95-6 डब्ल्युई कप स्टाईल विदाऊट वॉल्व्ह 37 रुपये, व्हीनस-723 डब्ल्यु-एन95-6 आरई कप स्टाईल विदाऊट वॉल्व्ह 29 रुपये, एफएफपी 2 मास्क आयएसआय सर्टीफाईड 12 रुपये, 2 प्लाय सर्जिकल विथ  लूप 3 रुपये, 3 प्लाय सर्जिकल विथ मेल्ट ब्लोन 4 रुपये, डॉक्टर्स कीट 5 एन-95 मास्क 3 प्लाय मेल्ट ब्लोन मास्क 127 रुपये अशा किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.

सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने उत्पादकाची किंमत,  त्यावरील किंमत तसेच प्रत्येकी विक्रेता व वितरकाचा नफा गृहीत धरून दर्जानुसार मास्कचे अधिकतम मूल्य प्रस्तावित केले होते. त्यानुसार शासन निर्णयाद्वारे मास्कचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास किंव नमुना सूचना दर्शनी भागात न लावल्याचे आढळल्यास साथरोग कायदा व  सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असे  अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वि.ता.जाधव यांनी कळविले आहे.