नंदुरबार (प्रतिनिधी) :- सामाजिक स्तरावर पसरत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या मनातील संभ्रम व भीती दूर होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षण कार्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी केले. नवापूर तालुक्यातील कडवान येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
संपूर्ण जगभरात कोरोना (covid-19) या आजाराने थैमान घातले आहे. सुरुवातीला व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत प्रसार होत असलेला हा आजार आता सामूहिक स्तरावर पसरू लागला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही साखळी तोडण्यासाठी जनजागृती करणे व नागरिकांचे कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शीर्षकाखाली उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातही जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे गावोगाव जनजागृती व सर्वेक्षण केले जात आहे. नवापूर तालुक्यातील कडवान येथे सुरू असलेल्या या सर्वेक्षण कार्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी भेट देऊन माहिती घेतली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत नागरिकांना कोरोना होऊ नये, यासाठी घ्यावयाची दक्षता आणि कोरोना झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना, याबाबत आरोग्य विभागाचे कर्मचारी माहिती देऊन प्रत्येक नागरिकाचे थर्मल स्कॅनिंग व पल्स ऑक्सीमीटर यांच्या माध्यमातून तपासणी करून घेत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सर्व माहिती व्यवस्थितरित्या दिली जात आहे किंवा नाही, याची चाचपणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी सर्वेक्षण स्थळी प्रत्यक्ष भेट दिली. यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून कोरोनाबाबत ग्रामस्थांना असलेली माहिती जाणून घेत, अधिक सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या आजाराबाबत नागरिकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम व भीती दूर होणे गरजेचे असून, नागरिकांनी कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तपासणीसाठी स्वतः पुढे येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री नंदकुमार वाळेकर, नवापूर तालुका आरोग्य अधिकारी श्री शशिकांत वसावे, विस्तार अधिकारी श्री दिलीप कुमार, कडवान ग्रामपंचायतीचे सरपंच श्री बंधू वळवी, ग्रामसेवक श्री पवार यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

मनरेगा अंतर्गत तलावाचे जलपूजन
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी मनरेगा कामांना भेटी दिल्या. लाॅकडाऊनमध्ये नवापूर तालुक्यात मनरेगा अंतर्गत ७८ तलावातील गाळ काढण्यात आला. त्यामध्ये अतिरिक्त ११२ टी एम सी जलसाठा निर्माण झाला आहे. चेडापाडा येथिल तलावाचे त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. नवापूर तालुक्यात मनरेगातून झालेल्या जलसंधारण कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पुढील वर्षात उर्वरित सर्व तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.