नंदुरबार (प्रतिनिधी):- मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त नंदुरबार डाएट व जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे तज्ञ वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानमालेचे सर्व मराठी प्रेमी नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन डाएट व शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालयाबरोबर शैक्षणिक संस्थाचा सहभाग वाढावा म्हणुन दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा’ दिनांक 14 जानेवारी 28 जानेवारी या कालावधीत साजरा करणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार, जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/ माध्यमिक) च्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मराठी भाषाप्रेमी नागरिकांसाठी दिनांक 27 व 28 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या,’ DIET Nandurbar’ या You tube चॅनल वरुन केले जाणार आहे .
दोन दिवसीय व्याख्यानमालेत पाहिल्या दिवशी प्रा.डॉ. माधव कदम, ग. तु. पाटील महाविद्यालय, नंदुरबार हे ‘मराठी भाषा – जतन व संवर्धन’ याविषयी व दुसऱ्या दिवशी प्रा.डॉ. गिरीश पवार ज. ग. नटावदकर कनिष्ट महाविद्यालय, नंदुरबार हे ‘मराठी भाषा – माझ्या मायबोलीची समृद्धी, स्थित्यंतरे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. प्रस्तृत व्याख्यानमालेचा सर्व पर्यवेक्षकीय अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विदयार्थी व मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डायट नंदुरबार चे प्राचार्य डॉ. जे .ओ.भटकर , शिक्षणाधिकारी (माध्य.) श्री. एम. व्ही. कदम, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्री. बी. आर. रोकडे ह्यानी केले आहे .