नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचे रोजगार धोक्यात आले असताना सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत  वितरीत करण्यात आलेले स्वस्त धान्य आणि  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत तांदळामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत  अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 12 लाख 84 हजार 321 लाभार्थ्यांना  3097 मे.टन गहू आणि 10801 मे.टन तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी 6421 मे.टन तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचे 95 टक्के तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 97 टक्के अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 98 टक्के मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे.

मे महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांव्यतिरिक्त साधारण 3 लाख 27 हजार केशरी कार्ड सदस्यांकरिता गहू व तांदूळ दुकानदारांमार्फत वितरीत करण्यात येत आहे. याशिवाय अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति कार्ड 1 किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे. त्याकरीता 106 मे.टन तूरडाळ व 106 मे.टन चनाडाळ प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात 1061 स्वस्त धान्य दुकानदार असून आतापर्यंत 11 स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी तीन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धान्य वाटप करताना तलाठी, ग्रामसेवक, केंद्र अधिकारी यांचेद्वारा लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेष पथकाद्वारे गोदामाचीदेखील तपासणी करण्यात येत आहे.

शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना धान्याचा लाभ देण्यासाठी त्यांची ऑनलाईन नोंदणी तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी पाडवी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनीदेखील मोहिमस्तरावर हे काम करण्याचे निर्देश दिले असून धान्य वितरणात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हाभरात शिधापत्रिका ऑनलाईन नोंदणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. संकटाच्यावेळी गरजूंना धान्य देण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. एका महिन्यात 10 हजार 360 कुटुंब लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे, तर 300 शिधापत्रिका ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी पुरवठा विभागातर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.सुटीच्या दिवशीदेखील वितरणाचे काम सुरू करून संकटकाळात धान्यवितरण सुरळीत ठेवण्यात यंत्रणेला यश आले आहे.