नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) सन 2022-23 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली येथे अन्नपुर्णा पापड उद्योग केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिलीप पाटील, कौशल्य विकास विभागाचे श्री. रिसे, कृषि उपसंचालक वसंत चौधरी, तालुका कृषि अधिकारी स्वप्नील शेळके, पीएमएफएमईचे नोडल अधिकारी विजय मोहिते, जन शिक्षण संस्थेचे बाबुलाल माळी आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ह्यातील बाबी शिथील केल्यामुळे वेगवेगळ्या पिकांवर आधारीत प्रक्रिया उद्योगांना जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाव असल्याने जिल्ह्यातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच उद्योजकांना कृषि मालावर आधारीत उद्योगांच्या उत्पादनासाठी विक्री व्यवस्थापनासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध  करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

श्री.भागेश्वर म्हणाले की, नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल असून जमीन, हवामान व नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. जिल्ह्यातील पिक विविधता पाहता प्रक्रिया उद्योगासाठी फार मोठा वाव आहे. जिल्ह्यात तृणधान्य पिकाखाली सुमारे 82 हजार 132 हेक्टर क्षेत्र असून नवापूर तालुक्यात भात, ज्वारी, शहादा व अक्कलकुवात मका, तर अक्राणी, अक्कलकुवा ज्वारी पिकाखाली मोठे क्षेत्र आहे. या तालुक्यात भात, मका, ज्वारी यावर आधारीत उद्योगांना मोठा वाव आहे. तर जिल्ह्यात कडधान्य पिकाखाली 21 हजार 73 हेक्टर क्षेत्र आहे.  नवापूर व अक्कलकुवा तालुक्यामध्ये तुर तसेच तेलबिया पिकांत नवापूर व शहादा  येथे सोयाबिन पिकाचे सुमारे 31 हजार 364 हेक्टर क्षेत्र आहे. शिवाय व्यापारी पिके  व प्रक्रिया करता येवू शकतील अशा पिकांचीही लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यात केळी पिकाखाली 5 हजार 737 हेक्टर, पपई 6 हजार 541 हेक्टर, मिरची 3 हजार 523 हेक्टर, तर कांदा 1 हजार 380 हेक्टर क्षेत्र आहे. अशा विविध पिकांचे क्षेत्र पाहता या पिकावर आधारीत प्रक्रिया उद्योगांना फार मोठा वाव आहे. तरी या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी , बेरोजगार, नव उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नाबार्डचे श्री. पाटील म्हणाले की, ह्या योजनेत सहभाग घेणाऱ्या लाभार्थींसाठी बँककर्ज वितरणामध्ये शक्य ती मदत नाबार्डच्या माध्यमातून करण्यात येईल. यावेळी दिलीप पाटील, राजेंद्र दहातोंडे यांनीही नव उद्योजकांना मार्गदर्शन केले.