नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या तसेच नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ‘कृषी कर्ज वितरण मेळाव्याचे’ आयोजन करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे उपस्थित होते.

N7 NEws

डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँक शाखांनी पीक कर्ज वाटपाचे 90 टक्के उद्दीष्ट जूनअखेरपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या गावातील एक मोठे गाव  निवडून तेथे मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. या मेळाव्यात कर्ज मंजूर करणारे कर्मचारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची माहिती द्यावी आणि अर्ज भरुन देण्यासाठी मदत करावी.  आजपर्यंत पीककर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस विविध शाखाचे बॅक प्रतिनिधी उपस्थित होते.