नंदुरबार : नवसंजीवनी योजनेअंतर्गत पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या 64 गावातील पात्र लाभार्थ्यांना जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी चार महिन्याचे धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंबांना नवीसंजीवनी योजनेअंतर्गत पावसाळ्यापुर्वी चार महिने पुरेल इतका धान्य पुरवठा करण्यात येत आहे. यात अक्राणी तालुक्यातील 47 गावाचा तर अक्कलकुवा तालुक्यातील 17 गावाचा समावेश आहे.

अंत्योदय कुटुंब योजना अंतर्गत अक्राणी तालुक्यातील 47 गावातील 4 हजार 382 कार्ड धारकांना 15 किलो गहू  व 20 किलो तांदुळ याप्रमाणे चार महिन्यासाठी 2629 क्विंटल गहू आणि 3505 क्विटल तांदूळ तर अक्ककुवा तालुक्यातील 17 गावातील 1 हजार 422 कार्ड धारकांना चार महिन्यासाठी 853 क्विंटल गहू आणि  1137 क्विटल तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.

प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी अक्राणी तालुक्यातील 47 गावातील 2 हजार 886 कार्ड धारकांना 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ याप्रमाणे 1146 क्विंटल गहू आणि  1719 क्विंटल तांदूळ, तर अक्कलकुवा तालुक्यातील 17 गावातील 1 हजार 463 कार्ड धारकांना 410 क्विंटल गहू  आणि 615 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.

रास्तभाव दुकानदारांना चार महिन्याचे नियतन मंजूर करून धान्य वाटप करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेश दिले  असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.