नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर  जिल्ह्यातदेखील येत्या 24 तासात पाऊस, अतिवृष्टी, तसेच जोराचे वादळवारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

शासकीय कार्यालयाकरीता निर्देश

तालुक्यातील सर्व तहसिल कार्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत. या कक्षात महसूल, नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, विज वितरण, कृषी विभागातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.

नियंत्रण कक्षातून तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक,मंडल अधिकारी, कृषीसेवक यांच्याशी वेळोवेळी संपर्क करुन गावातील स्थितीचा आढावा घेण्यात यावा. याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाला (दूरध्वनी क्रमांक 02564-210006) अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील सर्व आपात्कालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात यावीत.

तालुक्यातील असुरक्षित घरांचा आढावा घेऊन तेथील नागरिकांना तात्काळ समाजमंदीर, शाळा किंवा गावातील सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात यावे. नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावामध्ये खबरदारी म्हणून घंटागाडी, दवंडीद्वारे, सोशल मिडीयाद्वारे नागरिकांना चक्रीवादळाच्या दृष्टीने सुरक्षेबाबत अवगत करावे.

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी परवानगी शिवाय आपले मुख्यालय सोडू नये.

आरोग्य विभागातील ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस आजपासून पुढील 24 तास कार्यरत राहतील. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वादळामुळे जिल्ह्यातील रस्ता खचणे, दरी कोसळणे व इतर अनुषंगीक घटनांची तात्काळ दखल घेऊन त्याबाबत त्वरीत उपाययोजना कराव्यात.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वादळामुळे इलेक्ट्रीक पोल पडणे, व त्यावरील तारा तुटणे व इतर अनुषंगीक घटना लक्षात घेता तात्काळ उपाययोजना कराव्यात. चक्रीवादळादरम्यान मुख्य विद्युत जोडणी बंद करण्यात यावीत. संपर्क साधताना अडचण येऊ नये म्हणून सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी आपले भ्रमणध्वनी चार्ज करुन ठेवावे. 

नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन

जिल्ह्यात येत्या 24 तासात पाऊस व जोराचे वादळवारे होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. विशेषत: जुने घर, पत्र्याचे घर, कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या घरामधील राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता म्हणून आपल्या जवळच्या सामाजिक सभागृहात, शाळेत किंवा समाज मंदीरात तात्पुरता आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी आपले जनावरे झाडाखाली बांधू नये ते सुरक्षित ठिकाणी बांधावीत. नदी, नाले ,विद्युत पोल,तारा,जुने वृक्ष यापासून दूर रहावे.

स्वत:जवळ पिण्याचे पाणी, औषधे, काडीपेटी, दिवा असे साहित्य बाळगावे. संकटकालीन परिस्थितीत ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सेवक, गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्याशी संपर्क साधावा. सर्व दुकानदारांनी दुपारी 3 वाजेनंतर आपली दुकाने बंद करावीत.

नागरिकांनी व्हॉटस्ॲप किंवा इतर समाज माध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व  अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे आणि अधिकृत माहितीसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.