नंदुरबार :- निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अध्ययन स्तर निश्चितीबाबत प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे नुकतेच संपन्न झाले. जिल्हा सुकाणू समिती व जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्ष यांच्या सभेतील दिलेल्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल करनवाल , श्री.मैनक घोष यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय अध्ययन स्तर निश्चिती बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनातून सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील एक शिक्षक असे 95 शिक्षकांचे व तालुकास्तरीय विषय साधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. डॉ. जगराम भटकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सूचित केले की, आपण सुलभक म्हणून केंद्र स्तरावर कार्य करीत असतांना शिक्षकांना या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून दिल पाहिजे , कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता वस्तुनिष्ठपणे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती करून कोविड नंतरच्या परिस्थितीवर आधारित सद्यस्थिती जाणून घेण्याच्या हेतूने अध्ययन स्तर करणे अपेक्षित आहे. या अध्ययन स्तराच्या संख्यात्मक माहितीवर आधारित कृती कार्यक्रमाचे पथदर्शक स्वरूपात जिल्ह्यात राबवणूक केली जाईल, त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या गुणात्मक वाढीसाठी कृती कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व शाळांवर केली जाईल. तसेच या प्रशिक्षणात सहायक प्रकल्प अधिकारी श्री. निर्मल माळी यांनी आदिवासी विकास विभागातील नंदुरबार प्रकल्पात राबविण्यात येत असलेल्या भविष्यवेधी शिक्षण विचार अनुभवासह मांडले. सदर प्रशिक्षणासाठी अध्ययन स्तर निश्चिती बाबत भाषा व गणित विषयाच्या अध्ययन स्तर निश्चितीचे टप्पे व आवश्यक ती कार्यवाही सुलभक प्रथम संस्थेचे सुधीर कोटंगळे यांनी सविस्तर रीत्या प्रात्यक्षिकासह सादर केली. सदर प्रशिक्षणाचे समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी यांनी शिक्षकांना अध्ययन स्तर निश्चिती बाबत सविस्तर मार्गदर्शन करून या प्रशिक्षणाचे महत्व विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले, यात विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठपणे अध्ययन स्तर, त्यानंतर विद्यार्थ्यांचे योग्य स्तरावर मुलनिहाय नियोजन करुन कृती कार्यक्रम योग्यरीत्या राबविला तर प्रभावीपणे गुणात्मक वाढ होताना दिसून येण्याचा आशावाद निर्माण केला.सदर प्रशिक्षणास सुलभक म्हणून प्रथम संस्थेचे श्री. सुधीर कोटंगळे , श्री गणेश पाटील,श्री.प्रमोद मुगल हे उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमास अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार, डॉ.संदीप मुळे उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन व आभार अधिव्याख्याता श्री सुभाष वसावे यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील साधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.