नंदुरबार (प्रतिनिधी):- शिक्षकांनी विद्यार्थी विकासासाठी नाविन्यपूर्ण विचारातून अध्ययन अध्यापन करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी केले. नंदुरबार डाएट येथे आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्ह्यातील शाळांमधील इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा नंदुरबार येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. या कार्यशाळेचे प्रयोजन हे iRISE (आयराईज) उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, STEM शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. ह्या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न 7 i इनोवेशन मॉडेल, प्रशिक्षण पद्धत, सत्राच्या संकल्पना, पद्धती आणि धोरणे यांच्याद्वारे करण्यात आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे, ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईझ (iRISE) टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण दि. 13 ते 15 सप्टेंबर 2022 दरम्यान जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नंदुरबार श्रीमती मीनल करणवाल यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांशी संवाद साधला. या प्रशिक्षणातून आपण नेमके काय शिकलात? याविषयी शिक्षकांशी संवाद साधला. तसेच आपल्या संवादातून श्रीमती मीनल करणवाल यांनी, शिक्षकांनी विद्यार्थी विकासासाठी नाविन्यपूर्ण विचारातून अध्ययन अध्यापन करणे आवश्यक असून, उपलब्ध स्थानिक परिस्थितीतील साधनातून विज्ञान व इतर विषयांची संकल्पनात्मक दृष्टीने जोडणी करून अध्यापन करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षणास डाएट चे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, आयसर पुणे चे सहाय्यक प्रकल्प संशोधक डॉ सौरभ दुबे ,
डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री रमेश चौधरी, अधिव्याख्याता तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ राजेंद्र महाजन, अधिव्याख्याता डॉ.संदीप मुळे, श्री पंढरीनाथ जाधव, श्री सुभाष वसावे यांच्यासह iRISE प्रोग्राम ग्रुप, आयसर पुणे यांचा सहभाग लाभला.
जिल्ह्यातील 68 गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्व सत्र इंनोव्हेशन चॅम्पिअन्स,. दत्तात्रय वाणी, श्री. राहुल साळुंखे, श्री. अनंतकुमार सूर्यवंशी तसेच iRISE टीम चे प्राध्यापक डॉ. सौरभ दुबे, आयसर पुणे च्या सहयोगी प्राध्यापक श्रीमती श्रद्धा भुरकुंडे, श्रीमती प्रज्ञा पुजारी, श्री शुभम पाटील यांच्याद्वारे घेण्यात आले. या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना गणित व विज्ञान शिकविण्यास उपयोगी अशा क्रियाकल्पांसाठी उपयोगी असे साहित्य संच किट व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी समन्वयक तथा अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन व सहाय्यक शिक्षक श्री गोविंद वाडीले, देवेंद्र बोरसे यांनी परिश्रम घेतले.