नवापूर (प्रतिनिधी) : गुजरातमधून येणारे मजूर तालुक्याची डोकेदुखी ठरली आहे. त्यांनी आहेत तेथेच थांबावे, असे आवाहन करीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी आता तालुक्यात येणारे सर्व रस्ते बंद केले जात आहेत. गावागावातील लोकांची त्यासाठी मदत घेण्यात येईल. शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल, असे आ. शिरीषकुमार नाईक यांनी सांगितले.
नवापूर येथे पालिका सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. श्री. नाईक म्हणाले, तहसीलदारांनी रेशन दुकानदारांना सूचना कराव्यात, प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळेल कोणीही मनमानी कारभार करणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरात प्रभागनिहाय समित्या तयार करून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची माहिती संकलित करण्यात याव्यात, अश्या सूचना त्यांनी दिल्या.
तालुक्यातील सीमेवर कडक बंदोबस्ताची आवश्यकता असल्याने आज नवापूर तालुक्यात येणाऱ्या सर्व सीमा बंद करण्यात येणार आहेत. परराज्यातून येणारे काही लोक छुप्या मार्गेने प्रवेश करीत आहेत, त्यांचा शोध घेऊन होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कोणीही आपल्या गावात प्रवेश करणार नाही, याची दक्षता गावकऱ्यांनी घ्यावी. अशी कुणी व्यक्ती गावात आल्या प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. सीमावर्ती भागातून कुणीही जिल्ह्यात घुसखोरी करणार नाही, याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी, असेही आमदारांनी सांगितले.
नगराध्यक्षा श्रीमती हेमलता पाटील यांनी पालिकेमार्फत सुरू असलेल्या सुविधांची माहिती दिली.
शहरातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येईल. चाळीस ते पन्नास जणांना परिचारिकेचे प्रशिक्षण देण्यात येईल व त्यांच्या मार्फत शहरातील नागरिकांची तपासणी होईल. २५५ आरोग्य पथक तालुक्यात कार्यरत आहेत. ते आपल्या कार्यात सतर्कता पाळत आहेत. ग्रामसुरक्षा दल सक्रिय झाली आहेत. सरपंच, पोलिस पाटील व लोकप्रतिनिधीही सक्रिय आहेत. शहरात प्रभाग निहाय जागरूकता अभियान राबविण्याची आवश्यक असल्याचे यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.