नंदुरबार (प्रतिनिधी):- नंदुरबार शहरालगतच्या परिसरातील शेतात मादी बिबट्याने बस्तान मांडले असून, तिथेच चार पिलांना जन्म दिला असल्याचे आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.
नंदुरबार शहरालगत होळ तर्फे हवेली शिवारात उमर्दे रस्त्यावर कृषी विद्यालयामागील शेतात बिबट्याच्या मादीने चार पिलांना जन्म दिला आहे. शेखर मराठे यांच्या मालकीच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला झुडपांमध्ये ही पिले आढळली, तेव्हा ही बाब उघड झाली. त्यांनी लगेचच शेखर मराठे यांना ही माहिती दिली. शेखर मराठे यांनी वन विभागाशी संपर्क करीत आरएफओ मनोज रघुवंशी यांना पाचारण केले. रघुवंशी यांनी रात्री शेतात भेट देऊन पिलांची सुरक्षितता ठेवण्याविषयीच्या सूचना दिल्या. ज्या अर्थी बिबट्याच्या मादीने या शेतात पिलांना जन्म दिला त्याअर्थी बिबट्या नर आणि मादीचा नंदुरबार शहर परिसरालगतच वावर असल्याचे उघड झाले आहे. अलीकडेच नंदुरबारपासून दक्षिणेला हातोडा पुलाच्या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाले आणि आता थेट शहरातील उड्डाणपुलाजवळ पिले देण्याचीी घटना घडली आहे. नंदुरबार पासून 20 – 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोदा शहरात तर वरच्यावर उघडपणे बिबट्याचा मुक्तसंचार दिसू लागला आहे. शहादा, तळोदा व नंदुरबार या तीन तालुक्यांना जोडणारा तापी परिसर बिबट्यांच्या मुक्त संचाराचा व रहिवासाचा भाग बनला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.