नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद आरोग्य विभाग व पिरामल स्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्रिय क्षयरोग रुग्ण शोध मोहीम आणि कोविड- 19 लसीकरण’ जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

जिल्हा परिषद, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे, जिल्हा समन्वयक राहुल वळवी, क्षयरोग पर्यवेक्षक जयंत पाटील, अनिल पाटील, नंदकिशोर पाटील, कायर्क्रम सहाय्यक रामचंद्र बारी, पिरामल स्वास्थचे जिल्हा परिवर्तन अधिकारी नीलचंद्र शेंडे, साईनाथ अरगडे, रवींद्र भोये, विजय सिसोदिया, नीलम पाडवी आदी उपस्थित होते.

या मोहिमेअंतर्गत दुर्गम भागात क्षयरोगाची लक्षणे तपासण्यासाठी प्रभावी पद्धतीने जनजागृतीपर उपक्रम राबविणे, क्षयरोग चाचणीसाठी थुंकी गोळा करणे आणि त्याचे नमुने आरोग्य यंत्रणेकडे पाठविणे. क्षयरोगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी समुदायस्तरावर उपक्रम राबविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ही मोहीम जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये 100 दिवसांसाठी राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतून क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेसह कोविड 19 लसीकरणाबाबत नागरिकांचे समुपदेशन, लसीकरणाबाबत अफवा, शंकांचे निरसन जनजागृतीचे काम करण्यात येणार आहे.