नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील दुर्गम भागासह नवापूर, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील लसीकरण मोहिमेला गती  देण्यात यावी, त्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर,  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके  आदी उपस्थित होते.

            डॉ.भारुड म्हणाले, प्रत्येक तालुक्यासाठी दोन पथके तयार करून त्यांच्यामार्फत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी गावातील  लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने अधिकाधिक नागरिकाचे लसीकरण होईल याचे नियोजन करावे. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास सुरूवात होणार असल्याने मतदार यादीचा उपयोग करून पात्र व्यक्तींची नोंदणी करण्यात यावी.

            ग्रामीण भागात अँटीजन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. प्रत्येक फिरत्या पथकाद्वारे दिवसाला किमान 100 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. गावात नव्याने बाधित आढळल्यास त्याला त्वरीत जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. बाधितांची संख्या अधिक असल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करावे. अधिक बाधित असलेल्या गावात उप घटना व्यवस्थापकांनी भेट देऊन प्रत्येक बाधित व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात राहील याची खात्री करावी.

            उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची माहिती घ्यावी. कोविड केअर सेंटरसाठी कंत्राटी परिचारिकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. कोरोना चाचण्यांमध्ये निरंतरता रहावी यासाठी चाचण्यांच्या कीटचे व्यवस्थापन निटपणे करावे. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

            ग्रामीण भागात लसीकरण शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात प्रत्येक गावात याप्रकारचे शिबीर आयोजित करण्यात येईल, असे श्री.गावडे यांनी सांगितले.

            बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.