नंदुरबार  -दुर्गम भागातील आदिवासी जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात येतील आणि त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत  होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, उपाध्यक्ष राम रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, उपसभापती विजय पाडवी, जि.प.सदस्य बाजूबाई वसावे, सरपंच ममताताई पाडवी, वैद्यकीय अधिकारी स्वप्नील मासखेडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाडवी म्हणाले, दुर्गम भागासाठी आरोग्य सेवा महत्वाची आहे. आरोग्य सुविधांचा विकास करण्यावर शासनाने भर दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे परिसरातील जनतेला चांगले उपचार मिळू शकतील. आरोग्य केंद्र वेळेत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यकत केला. केंद्रात दर्जेदार सुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनेअंतर्गत हे प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात येत असून त्यावर 5 कोटी 61 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. पॅथोलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष, शवविच्छेदन गृह, औषध भांडार आदी सुविधा येथे असतील.