नंदुरबार  :  डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी डासांची उत्पत्ती ठिकाणी परिसरात निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी आर.बी.ढोले यांनी केले आहे.

किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 2019 मध्ये एकूण 2002 रक्त जल नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 153 डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील 298 असे 451 रुग्ण एन.एस.1 चे  आढळून आले आहेत.

माहे एप्रिल 2020 मध्ये एकूण सरकारी रुग्णालयातील 163 रक्त जल नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात 6 डेंग्यू निश्चित रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयातील 6 असे 12 रुग्ण एन.एस.1 चे आढळून आले आहेत. मागील दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येते.

डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस या डासांच्या चावण्यापासून होत असल्याने तसेच या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.

 घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत.अंगभर कपडे घालावेत, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, डास पळवून लावणाऱ्या क्रीम व कॉईल चा वापर करावा जेणे करुन डासोत्पत्तीला व आजार प्रसाराला प्रतिबंध होईल व डेंग्यू आजाराला टाळता येईल.

डेंग्यू हा आजार नोटिफायबल आजार असल्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व खाजगी प्रयोगशाळांनी  रुग्णालयामध्ये डेंग्यू दुषित रुग्ण आढळून आल्यास त्याची सूचना त्वरीत जिल्हा हिवताप अधिकारी  कार्यालयास द्यावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी फक्त इलायझा टेस्ट असून त्याची टेस्ट जिल्हामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेन्टर येथे कार्यान्वित केलेली आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायईकांनी आपल्या रुग्णालयांमध्ये डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे डेंग्यू दुषित आढळून आलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने डेंग्यू आजाराच्या निदानाकरीता सेन्टीनल सेन्टर येथे पाठविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनही श्री.ढोले यांनी केले आहे.