नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डी एल एड प्रवेशासाठी पुन्हा एकदा संधी प्राप्त करून देण्यात आली असून, शिक्षण क्षेत्रात काम करून भावी पिढी घडविण्यासाठी व देशसेवेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेऊन आपल्या उज्वल भवितव्याचा पाया तयार करावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ श्री जगराम भटकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणपरिषद , महाराष्ट्र , पुणे डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन २०२०-२१ च्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरणे बाबत प्रक्रिया सूरी होत आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका ( D.EL.Ed. ) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या . तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येत आहेत . प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणपरिषद , महाराष्ट्र, पुणे यांच्या www.man.ac.in संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत .
प्रवेशाची शैक्षणिक पात्रता- इयत्ता १२ वी उत्तीर्ण ( खुला संवर्ग ४९.५ % व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग ४४.५ % गुणांसह ), प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी- दि .२२ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२० राहणार असून, पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करणेसाठी दि .२२ डिसेंबर ते दि .२७ डिसेंबर २०२० पर्यंत कालावधी दिलेला आहे.
प्रवेश अर्ज शुल्क ( ऑनलाईन भरणे ) – खुला संवर्ग रुपये २०० तर खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग रुपये १०० असून, यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून Approve करून घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही, असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती ( Correction ) मध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले, असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन Approve केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे . विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयाची स्वतः निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वतःच्या ईमेल, लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे . प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर ( D.EL.Ed ) प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी. असे अध्यक्ष राज्यस्तरीय डी.एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती , पुणे तथा संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख श्री. रमेश चौधरी, वरीष्ठ अधिव्याख्याता किंवा डॉ. श्रीमती वनमाला पवार, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. श्री. जगराम भटकर यांनी केले आहे.