नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात रेमडिसीवीर या कोरोनावर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधाचा तुटवडा भासत असल्याने 10 हजार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्याची विनंती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपचारासाठी डॉक्टर्स आणि रुग्णांकडून रेमडिसीवीरची  मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या औषधाचा शासकीय व खाजगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्याला 10 हजार रेमडिसीवीर इंजेक्शन देण्यात यावेत, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी

 जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या  लक्षात घेता 200 बेड्स वाढविण्याचे नियोजन करण्यात येत असून त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 6 एमडी आणि 4 अॅनेस्थेशिया तज्ज्ञांची आवश्यकता आहे. मुंबई येथील 3 आणि लातूर येथील एक डॉक्टर नंदुरबार येथील स्थानिक रहिवासी असून येथे सेवा देण्यासाठी इच्छुक  आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता दोन महिन्यांसाठी या डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोविड केअर सेंटरसाठी 5 कोटींची मागणी

जिल्ह्यात तळोदा येथे 50, नवापूर येथे 50, नंदुरबार येथे 100 आणि शहादा येथे 100 ऑक्सिजन बेड्सची सुविधा असलेल कोविड केअर सेंटर सुरू करण्यात  येणार असून आवश्यक सुविधांची निर्मिती व इतर अनुषंगिक बाबींसाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी पालकमंत्री  ॲड.पाडवी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात कोविड विषाणूचा वाढता संसर्ग  लक्षात घेता अधिकच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना पररिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी  वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपययोजना करण्याचे निर्देशही यंत्रणेला दिले होते. तसेच जिल्ह्यासाठी आवश्यक बाबींची माहिती घेऊन आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी शासनस्तरावरावरून सर्व सहकार्य करण्यात येईल असेदेखील सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्वरीत आवश्यक बाबींचा पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.