नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात यावर्षी 25 हजार 210 शेतकऱ्यांना 273 कोटी 9 लाख एवढ्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम एकूण उद्दीष्टाच्या 44 टक्के असून गतवर्षीपेक्षा 45 कोटीने जास्त आहे.

जिल्हा सहकारी बँकेने सर्वाधिक 12 हजार 856 शेतकऱ्यांना 82 कोटी 10 लाख कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बँकेने 487 शेतकऱ्यांना 4 कोटी 96 लाख तर खाजगी बँकांनी 792 शेतकऱ्यांना 21 कोटी 50 लाख, तर राष्ट्रीयकृत बँकांनी 11 हजार 75 शेतकऱ्यांना 164 कोटी 53 लाखाचे पीक कर्ज वाटप केले आहे. गतवर्षी खरीप हंगामात 15  हजार 293 शेतकऱ्यांना 228 कोटी 35 लाख अर्थात उद्दीष्टाच्या 39 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते.

            यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार तालुका स्तरावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना कर्ज वाटप वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनातर्फे बँकाकडे पीक कर्जाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यापुढील काळातदेखील कर्ज वाटप वाढविण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. लीड बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक आठवड्यात पीक कर्ज वाटपाचा आढावा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी समस्या येत असल्यास त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील डॉ.भारुड यांनी केले आहे.