नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधासाठी नंदुरबार जिल्ह्यातून परराज्यात जाणारे व इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिशानिर्देश जारी केले आहेत.

मुळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंव व्यक्ती समूहाची माहिती त्या तालुक्यातील तहसीलदार एकत्रित करतील. या माहितीत आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक व पत्ता, ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थळ आणि वाहनाच्या प्रकाराचा स्पष्ट उल्लेख असावा. गटाच्या बाबतीत गटप्रमुख एकत्रित अर्ज करू शकतील. वैद्यकीय अधिकाऱ्याचे शीतज्वर नसल्याचे प्रमाणपत्र व्यक्तीनिहाय आवश्यक असेल. ई-पाससाठी http://covid-19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल.

नोडल अधिकारी राज्यनिहाय आणि जिल्हानिहाय यादी तयार करून ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात जायचे आहे तेथील नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून व्यक्तींना पाठविण्याची कार्यवाही करतील. तत्पूर्वी त्या राज्याने किंवा जिल्ह्याने स्विकृतीची व्यवस्था केली असल्याची खात्री करतील व तसे पत्र प्राप्त करून घेतील. स्वत:च्या वाहनाने जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाबाबत नोडल अधिकारी समन्वय साधून जाण्याची परवानगी देतील. वाहनासाठी परवाना तयार करून त्यावर प्रवासी व्यक्तीचे नाव व मार्गाचा उल्लेख असेल.

वाहतूकीपूर्वी वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यात येईल. प्रत्येक वाहनासोबत वाहन परवाना, प्रवाशांची यादी, प्रत्येक प्रवाशाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रत्येक प्रवाशाचे बंधपत्र, वाहन प्रमाणपत्र, वाहतूक आराखडा असणे आवश्यक आहे. या प्रवासादरम्यान वाहन कमीत कमी ठिकाणी थांबणे अपेक्षित राहील.

राज्यांतर्गत बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात ये-जा करण्याची परवानगी नसेल. रेड झोनमधून नंदुरबारला येणाऱ्या व्यक्तीला परवानगी देण्यासंदर्भात काळजीपूर्वक निर्णय घेण्यात येईल. व्यक्तीला जिल्ह्यातून बाहेर जाण्याची अनुमती देताना त्याच्याजवळ शीतज्वर नसल्याचे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिाकचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नोडल अधिकारी संबंधित जिल्ह्याच्या नोडल अधिकाऱ्याशी समन्वय साधून परवानगी देतील व त्यानंतर प्रवाशी वाहतूक शक्य होईल.

जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणी करून 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. बाहेरची वाहने चेकपोस्टजवळ पोहोचल्यानंतर त्याठिकाणी वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल गनद्वारे तपासणी करून गृह किंवा संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारण्यात येईल. गृह विलगीकरणाचे उल्लंघन झाल्यास 14 दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्यात येईल.

परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, मार्गक्रमण आराखडा, वाहनाची परवानगी, प्रवासाचा कालावधी यांची खात्री करण्यात येईल. इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींनी प्रवास करताना रेड झोन किंवा प्रतिबंधीत क्षेत्रातील जिल्ह्यात मुक्काम करू नये ही अट घालण्यात येईल. येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक असेल , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.