नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात आयोजित करण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरण शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकही लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

तळोदा येथील शेठ के.डी.हायस्कूल येथील कोरोना लसीकरण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परीषद  अध्यक्षा सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात 230 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी तहसिलदार गिरीश वखारे ,  गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. नोंदणी केलेल्या नागरिकांचे मोहिमस्तरावर लसीकरण करण्यात आले. मोड येथेदेखील श्रीमती वळवी यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी राहुल चौधरी उपस्थित होते.

नंदुरबार तालुक्यात 1904 नागरिकांचे लसीकरण

नंदुरबार तालुक्यात लसीकरण मोहिमेने चांगला वेग घेतला असून सोमवारी दिवसभरात 1904 नागरिाकांचे  लसीकरण करण्यात आले. चार फिरत्या पथकाद्वारे ग्रामीण भागातील लसीकरण करण्यात आले. नगाव येथे 107, जुनमोहिदा 110, हाटमोहिदा 43, वैदाणे 204 आणि नंदुरबार शहरात 957 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

शहादा तालुक्यातही लसीकरण मोहिम

शहादा तालुक्यातदेखील लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परीषद शाळेतील शिक्षक ग्रामीण भागात जनजागृतीसोबत नोंदणीचे कामदेखील करीत आहेत. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. तऱ्हाडी येथे 123, लोणखेडा 110 आणि  लक्कडकोट आणि अंबापूर  येथील 98 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

धडगाव तालुक्यात लसीकणासोबत आरोग्य तपासणी

            धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातही फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. येथे होत असलेल्या जनजागृतीमुळे नागरिक लसीकरण नोंदणीसाठी पुढे येत आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी शिक्षकांसोबत तलाठी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधीदेखील प्रयत्न करीत आहेत.

            मुंदलवड गावात तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व सांगितले. यवेळी वेगवेगळ्या पाड्यावरील कारभारी उपस्थित होते. गावातील 54 नागरिकांचे सोमवारी  लसीकरण  करण्यात आले. लसीकरण शिबिरासाठी सरपंच सुनीता वळवी, उपसरपंच विनोद  वळवी, ग्रामपंचायत सदस्य योगिता वळवी यांचे सहकार्य मिळाले.

            तालुक्यातील आचपा पिंपरी येथे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांची भेट घेऊन त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून देण्यात आले. खामला येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत नागरिकांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यात आली.