नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कायमचे दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि त्यासाठी महिला रुग्णालय उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

महिला रुग्णालय आणि  आरपीटीपीसीआर लॅबच्या उद्घाटन  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरिषकुमार नाईक,माजी मंत्री पद्यमाकर वळवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, गेल्या काही वर्षापासून महिला रुग्णालयाचे काम सुरु होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे काम अंत्यत वेगाने पुर्ण करण्यात आले आहे. आरपीटीपीसीआर लॅबमध्ये अंत्यत आधुनिक यंत्रणा असून कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक स्वॅब चाचणी कमी वेळेत करणे सुलभ होणार आहे.

एका‍ दिवसात 1200 स्वॅबची चाचणी होणार असून विभागात सर्वात चांगली यंत्रसामुग्री जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी कमी वेळेत तोडणे शक्य होऊ शकेल. कोरोना नियंत्रणासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी चांगली कामगिरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला रुग्णालयाच्या  वरच्या मजल्याचे कामही करुन ते परीपूर्ण हॉस्पीटल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. धडगाव,अक्कलकुवा सारख्या भागात वैद्यकीय अधिकारी जाण्यास तयार नसतात अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधाचा विकास करण्यावर अधिक भर देण्यात येईल. अशा दुर्गम भागात ब्लॅड स्टोअरेज युनिट उभारण्यात येईल. तसेच महिला रुग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सीजन युनिट उभारण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. वैद्यकीय महाविद्याय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ.गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील माता मृत्यू दर  आणि कुपोषण कमी करण्यासाठी महिला रुग्णालय महत्वाचे आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी आरटीपीसीआर लॅब आणि कोविड हॉस्पीटल उपयुक्त ठरेल. जिल्हा आरोग्य यंत्रणेने वेगाने कोविड हॉस्पीटल व लॅबची सुविधा निर्माण केल्याबद्दल त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे अभिनंदन केले.

श्रीमती वळवी यांनी कोरोना नियंत्रणसाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले.