नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया संस्थेतर्फे स्थानिक प्रशासनात संगणकीय प्रणालीच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी देण्यात येणारा पुरस्कार जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास जाहीर झाला आहे.

कोरोनाकाळात संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत आरोग्यदर्शक मॅप आणि प्रतिबंधीत क्षेत्र व रुग्णालयांचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी  धमेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान केंद्राने जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रतिबंधीत क्षेत्राची माहिती मॅपिंगद्वारे उपलब्ध करून दिली होती. त्यासोबतच प्रत्येक रुग्णालयातील  खाटांची क्षमता, वापर, कोरोना बाधितांची माहितीदेखील आलेखाच्या रुपात उपलब्ध करून देण्यात आल्याने या माहितीचा प्रशासन आणि नागरिकांना चांगला उपयोग झाला.

या कामगिरीची दखल घेऊन सीएसआयने जिल्हा सूचना विज्ञान केंद्राची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या संस्थेतर्फे देशभरात संगणकाच्या सहाय्याने उत्तम सुविधा निर्माण करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 12 फेब्रुवारी 2021 रोजी  लखनौ येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.