नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र  भारुड यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा घेण्यासाठी शहादा तालुक्याला भेट दिली. त्यांनी उपविभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत मोहिमेचा आढावा घेतला.

बैठकीस परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे, पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गट विकास अधिकारी पी.टी.गोस्वामी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी आर.एन.वळवी आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, सर्वेक्षण करताना नागरिकांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शनही करावे. कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या गावात तापाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्यावे. मोठ्या गावात अधिकाधीक व्यक्तींची स्वॅब चाचणी करण्यावर भर द्यावा. मोहिमेचे काम कालमर्यादेत पूर्ण करण्याबरोबर ऑनलाईन माहिती भरण्याचे कामही वेळेवर करावे, असे निर्देश त्यांनी दिले. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मोहिदे गावाला भेट देऊन सर्वेक्षणाच्या कामाची पाहणी केली आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ धुण्याबाबत आवाहन केले. जिल्हाधिकारी भेटीला आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

डॉ.भारुड यांनी शहादा तालुक्यातील  शासकीय व खाजगी कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी नियोजित ग्रामीण रुग्णालय व नवीन उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली.