नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली.

कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, या कक्षात महिला कर्मचाऱ्यांना भोजनाच्यावेळी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करता येईल. कक्षात पिण्याचे शुद्ध पाणी व इतर आवश्यक सुविधा देण्यात येतील. कक्षाची रचना महिला कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात येईल. कार्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार  घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.पाटील म्हणाले, महिला दिन एक दिवस साजरा न करता वर्षभरात महिला कर्मचाऱ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम साजरे करावे.

यावेळी श्रीमती पंत, विधी अधिकारी दिपाली कलाल , जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी पवार, लेखाधिकारी रुपाली पुंडे आणि नायब तहसिलदार आशा सोनवणे  यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.