नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणून  लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्कूल बसचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत झाला.

            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

            अहिंसा पब्लिक स्कूल ने एक, पी.जी.पब्लिक स्कूल नंदुरबार 2, के.आर.पब्लिक स्कूल नंदुरबार 2, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार 2, नेमसुशिल  इंग्लिश स्कूल नंदुरबार 2, चावरा इंग्लिश स्कूल नंदुरबार 2 आणि खापर येथील ईरा इंटरनॅशनल स्कूलने 2 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

            जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. नियोजनपूर्वक वाहनांचा उपयोग करून ग्रामीण भागात अधिकाधिक लसीकरण करण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            वाहनांचा उपयोग करून नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना श्री.गावडे यांनी दिल्या.