नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता  गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड यांनी केले आहे.

या सणासाठी 28 मार्च ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत अर्थात ‘ होली वीक’ मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्यावेळी चर्चमधील जागेनुसार उपस्थितीचे नियोजन करावे. मोठे चर्च असल्यास जास्तीत जास्त 50 आणि लहान जागा असल्यास 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभेचे आयोजन करावे.  सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी आवश्यकतेनुसार 4 ते 5 विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करावे.

ख्रिश्चन धर्मीय भावीक प्रार्थना सभेच्यावेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. चर्चच्या व्यवस्थापकांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच या सणासाठी देण्यात येणारे संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारीत करावे.

चर्चच्या बाहेर किंवा रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे किंवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा कार्यक्रमाचे आयोजन करू नये किंवा मिरवणूका काढू नये. या संदर्भात शासनाच्या विविध विभागांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. सण सुरू होण्यापूर्वी आणखी सुचना प्रसिद्ध झाल्यास त्याचेही पालन करावे.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सुचनांचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.