नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यातील आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि लसीकरण तसेच सॅम आणि मॅम बालकांचा (कमी वजनाची बालके) शोध घेण्यासाठी 14 जूनपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली  आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोहिमेसाठी 97 वैद्यकीय अधिकारी, 65 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि स्वयंसेवी संस्थेचे 25 सदस्यांची नेमणूक तयार करण्यात आली आहे. उपकेंद्रनिहाय तयार करण्यात येणाऱ्या पथकांचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अंगणवाडी केंद्रनिहाय विशेष पथकामार्फत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करुन बालकांचे वजन, उंची,लांबी घेऊन सॅम आणि मॅम बालकांचा शोध आणि गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच 0 ते 6 वर्ष वयोगटातील स्थलांतराहून परत आलेल्या लाभार्थींची स्वतंत्र यादी तयार करुन त्यांची आरोग्य तपासणी करून बाळ कुपोषणात जाऊ नये याकरिता मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

कोरोनापासून बचावाकरिता पथकातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले ट्रिपल लेयर मास्क, फेस शील्ड, ग्लोव्हज, सॅनिटायझर, कॅप इत्यादी साहित्य पुरविण्यात आलेले आहे. अंगणवाडीस्तरावर स्क्रिनिंग करतांना लाभार्थ्यांना टप्याटप्यात बोलविण्यात येणार असून सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे, पाणी व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची कटाक्षाने काळजी घेण्यात येणार आहे.  सॅम व मॅम बालकांना मोहिमेनंतर व्हिसीडीसी, एनआरसी, सीटीसीद्वारे उपचार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी दिली आहे.