नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परप्रांतीय आपल्या  मूळ गावी  गेल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राच्या वेबपोर्टलवर रिक्तपदाची माहिती भरुन बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म.कोल्हे यांनी केले आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र कार्यालयामार्फत खाजगी व सार्वजनिक आस्थापनेची नोंदणी करुन रोजगाराच्या सेवा सुविधा पुरविल्या जातात. यात रिक्त पदे अधिसूचित करणे, बेरोजगार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मुनष्यबळाची माहिती उपलब्ध करुन देणे, रोजगार मेळावा घेवुन रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्तपदे अधिसूचित करणे, कौशल्य विकास प्रशिक्षित उमेदवारांची माहिती, मनुष्यबळाची नोंदणी बाबतच्या सुविधेचा समावेश आहे.

खाजगी व सार्वजनिक आस्थापनांनी आपल्या आस्थापनेतील रिक्त पदाची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर  ई-आर 1 या पर्यायावर क्लिक करुन भरावी. प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत माहिती सादर करावी. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत (दूरध्वनी क्रमांक 02564-210026)  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड,तळ मजला रुम नंबर 27 नंदुरबार या कार्यालयांशी संपर्क करावा.