नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या सूचना न पाळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी प्रशासनातर्फे  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर जाण्याची परवानगी असलेल्या प्रत्येक नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या सुचनेचे पालन करणे आवश्यक आहे.

परंतू अद्याप काही नागरीक यांचे पालन करतांना आढळून येत नाही.  त्यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाईचे आदेश यापूर्वी निर्गमित केले होते. सुधारीत आदेशानुसार दंडाच्या रक्कमेत सुधारणा करण्यात आली आहे.

एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकताना प्रथम आढळल्‍यास रु.200 इतका दंड आकारण्यात येईल, दुसऱ्यांदा रु.400 आणि तिसऱ्यांदा रु.400 दंड व फौजदारी कारवाईस पात्र राहील.

सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी मास्क, रुमाल न वापरल्यास प्रथम रु.200 दुसऱ्यांदा रु. 400 तर तिसऱ्यांदा रु.400 दंड व फौजदारी कारवाई  करण्यात येईल.

शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन न केल्यास प्रथम रु.200 दंड प्रतिग्राहक, व्यक्ती, प्रती आस्थापना मालक-विक्रेता, दुसऱ्यांदा रु.400 दंड, तर तिसऱ्यांदा आढळल्यास रु.400 दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस व महसूल कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले असून सर्व नागरीकांनी याचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.