नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.  रेमडिसीवीरच्या वापराबाबत डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात यावे आणि रुग्णांना गरज असेल तेव्हाच या औषधाचा वापर करण्याच्या सूचना पथकातील सदस्यांनी दिल्या.

पथकात एनसीडीसीचे सहसंचालक डॉ.संकेत कुलकर्णी आणि सहायक प्राध्यापक डॉ. सौरभ मित्रा  यांचा समावेश होता. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, शाहूराज मोरे, महेश सुधाळकर, जिल्हा  शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

कोरोना चाचणी लॅब 24 सुरू ठेवण्यासाठी खाजगी तंत्रज्ञांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात याव्यात.  अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर एका ठिकाणी उपचार करावा. कोरोना बाधित व्यक्तींच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना पथकातील सदस्यांनी केलया.

डॉ.भारुड यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली. नवीन रुग्णवाहिकाचा रॅपीड अँटीजन चाचणीसाठी आणि  कोराना बाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी उपयोग होईल. रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे,  असे त्यांनी सांगितले.