नंदुरबार :  जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे प्रत्यक्षात विक्रीसाठी शिल्लक कापसाची माहिती घेण्यासाठी नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे  प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी व पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी यंत्रणेला दिले आहेत.

शासनाने 24 एप्रिल पासून राज्यात कापूस खरेदीस पुन्हा प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीसाठी शिल्लक आहे. 26 मे अखेर नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 548 कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी केली असून 2 हजार 201 शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापसाची विक्री केली. विविध कारणामुळे जिल्ह्यातील 3 हजार 347 नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस विक्री होणे बाकी आहे.

            राज्यात कापूस खरेदीचे बाजार मुल्य दर व शासनाचे हमीभाव दर यामध्ये तफावत आहे. कापूस खरेदीचे शासनाचे हमीदर हे बाजारातील दरापेक्षा जास्त असल्यामुळे जिल्ह्यातील काही व्यापारी हे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापूस विक्री करण्याची शक्यता आहे. तसेच लवकर पावसाळ्यास सुरूवात होणार असून जिल्ह्यातील  नोंदणीकृत कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी शिल्लक कापसाची आकडेवारी जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गावनिहाय  याद्या तयार करण्याचे आदेश सहायक निबंधक,सहकारी संस्था यांना देण्यात आले आहेत.

N7 NEws

शिल्लक कापसाच्या माहितीसाठी पथकाची नेमणूक

        शेतकऱ्याकडील शिल्लक कापसाची माहिती संकलनासाठी तहसिलदारामार्फत नियोजन करण्यात यावे.  तलाठी,ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावनिहाय याद्या प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसात प्रत्यक्ष जागेवर जाऊन संबधीत शेतकऱ्याच्या  सातबारा उताऱ्यावरील कापूस पिकाखाली एकूण क्षेत्राची आणि  शिल्लक कापसाची खात्री करण्यासाठी कापूस साठ्याचे शेतकऱ्यासह फोटो घ्यावेत. ही प्रक्रीया दोन दिवसात पूर्ण करावी.

गाव निहाय तपासणी पंचनामा झालेल्या यादीपैकी प्रत्येकी 10 टक्के याद्यांची फेरतपासणी संबधीत तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी केल्यानंतर गावानिहाय याद्या संबधित तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी द्याव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.