नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे कोरोना संकटकाळात पथराईच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कर्जमुक्तीमुळे बियाणे व खतांसाठी नवे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने काशिनाथ वळवी यांचे शेत पपई आणि कापसाच्या पीकाने बहरले आहे.

काशिनाथ वळवी यांचे पथराई शिवारात 10 एकराचे शेत आहे. त्यांची तिन्ही मुले शेतातच राबतात. संपुर्ण कुटुंब शेतावर अवलंबून असल्याने दरवर्षी कर्ज काढून शेत पिकवायचे. पीक आल्यावर कर्ज फेडले जायचे. मात्र गेली तीन वर्षे पाऊस कमी झाल्याने पीकांचे नुकसान झाले आणि त्यांना कर्ज फेडता आले नाही.

सतत तीन वर्षे पाऊस कमी झाल्याने गावाला पाणी देणारी शेतातली विहिर अटली. पाण्याअभावी पीक हातचे गेले. कर्जाची रक्कम वाढू लागल्याने आणि गोठ्यातील गुरांना चारा-पाणी देण्याची समस्या असल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. बँकेकडून नवे कर्ज मिळत नव्हते आणि सावकाराकडील व्याजाचे दर परवडणारे नव्हते.

शासनाने कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्याने वळवी यांच्या मनात नवी आशा निर्माण झाली. सोसायटीचे 1 लाख 45 हजाराचे कर्ज आणि 35 हजाराचे व्याज आधार प्रमाणिकरण केल्यानंतर माफ झाले. नवे कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला. त्यांना नव्याने 1 लाख 45 हजाराचे कर्ज मिळाले. हाताशी पैसा आल्यावर त्यांनी नव्या उत्साहाने शेतात ऊस, पपई, मिरची आणि कापसाची लागवड केली.

आज त्यांचे शेत पिकाने बहरले आहे. पपईचा पहिला तोडा झाला, हाताशी पैसे आले आहे.  पाऊस चांगला झाल्याने विहिरीला चांगले पाणी आले आहे. दुष्काळात ग्रामस्थांनी बंधारा बांधल्याने  पाटचारीलाही पाणी आले आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी संकटात सापडला असताना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेने दिलासा देण्याचे काम केल्याचे ते आवर्जुन सांगतात.

पथराई सोसायटी अंतर्गत  पथराई, खोडसगाव, वरुळ, आभरावी शिवार, सरवाळा येथील 109 शेतकऱ्यांचे 84 लाखाचे कर्ज माफ झाले आहे. कर्जमुक्तीमुळे शेतकरी नव्या उमेदीने शेतकामाला लागल्याचे या परिसरात फिरताना दिसून येते.

काशिनाथ वळवी-कर्जमुक्ती झाली नसती तर सावकाराकडून जादा व्याजाने पैसे घ्यावे लागले असते. वेळेवर मदत मिळाल्याने शेत पिकवता आले. त्यामुळे शासनाला धन्यवाद द्यावेच लागतील. दोन-तीन वर्षे चांगला पाऊस झाल्यास बँकेकडेदेखील जावे लागणार नाही. आपल्या श्रमाने शेतीत अधिक उत्पन्न काढू.