नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने एमएचटी-सीईटी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना संदर्भातील नियमाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले  आहे.

            एमएचटी सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर डॉ.भारुड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सूचना अधिकारी धर्मेद्र जैन, जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप, तहसिलदार उल्हास देवरे, महाऑनलाईनचे जिल्हा समन्वय राहुल वाघ, तंत्रनिकेतन महाविद्यालय, शहादाचे प्राचार्य सुनिल अंधारे, शासकीय तंत्रनिकेतनचे वरिष्ठ अधिव्याख्याता एम.एम.गोस्वामी आदी उपस्थित होते.

            सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरीता पीसीबी गटासाठीच्या सामायिक परीक्षा 2020 (एमएचटी-सीईटी) ऑनलाईन पद्धतीने 1 ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षा सकाळी 7-30 ते दुपारी 12 तसेच दुपारी 12-30 ते सायंकाळी 6.45 या दोनसत्रात होईल. ही परीक्षा जिल्ह्यासाठी डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय लोणखेडा ता.शहादा केंद्रावर घेण्यात येणार असून 480 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

            एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनीच परीक्षा केंद्रावर यावे. अनावश्यक गर्दी करु नये, परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर, व शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंन्द्रावर जाण्यासाठी गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने बसेसची उपलब्धता करावी व परीक्षा सुरळीत पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.