नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2022 (एमएचटी-सीईटी) 5 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022  या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी सामायिक परीक्षा 2022-2023 ही डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (लोणखेडा परिसर) या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारी या दोनसत्रात घेण्यात येणार आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 7-00 वाजेपासून ते संध्याकाळी 6-00 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये.

सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.