नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा प्रशासनाने येत्या मान्सून काळात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीची शक्यता लक्षात घेवून जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. अशाच प्रकारे नियोजन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व यंत्रणांनी सतर्क राहून करावे, जेणेकरुन जीवित व वित्तहानी टाळता येईल. अशा सूचना प्रधान सचिव, वने तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या आहेत.

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात जिल्हा आपत्ती नियंत्रणाअंतर्गत करण्यात आलेल्या नियोजनाची आढावा बैठक पालक सचिव श्री. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, मुख्य वनसंरक्षक, (धुळे) दिगंबर पगार उपस्थित होते.

पालक सचिव श्री. रेड्डी म्हणाले, जिल्हा आपत्ती प्राधिकरणातंर्गत सर्व यंत्रणांनी मान्सुन काळात आपत्ती नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारचे नियोजन केले आहे. आपत्ती काळात सर्वच यंत्रणांची भूमिका महत्वाची असल्याने सर्वांनी समन्वयाने व सतर्क राहून काम करावे. गाव आणि तालुका पातळीवरील यंत्रणेला आपत्तीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. पूरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी तयार करण्यात येवून त्याप्रमाणे बचाव पथकांना प्रशिक्षण देखील देण्यात यावे. अतिवृष्टीकाळात प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मधून पाणी नियंत्रणासाठी जलसंपदा विभागाने नियोजन करावे. पाण्याचा विसर्ग सोडतांना कोणतीही गावे बाधित होणार नाही याची दक्षता यंत्रणेने घ्यावी. नदी व नाल्यांच्या काठावरील पुररेषेतील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी. पुलावरुन पाणी जात असल्यास याबाबतची माहिती देणारे सूचना फलक लावावेत. पूरबाधित नागरिकांचे व जनावरांचे वेळेत स्थलांतर करावे. स्थलांतरीत नागरिकांच्या कँम्पमध्ये आवश्यक त्या सर्व सोईसुविधा वेळीच उपलब्ध होतील याबाबत नियोजन करावे.

संपर्क तुटणाऱ्या नर्मदाकाठावरील गावांतील नागरिकांना धान्य व औषधांचा पुरवठा नियमित होईल याकडे लक्ष द्यावे. दरड कोसळणारी ठिकाणे निश्चित करून याठिकाणी दक्षतेचे फलक लावावेत.  वाहतूक विस्कळीत होणार नाही याकडेही लक्ष द्यावे. अतितात्काळ परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी प्रतिसाद दल (क्यूआरटी) तसेच राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपर्कात रहावे. आपत्तकालीन नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहील याची दक्षता घ्यावी. पूरपरिस्थितीत नागरिकांची गैरसोय होवू नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खतांची उपलब्धता करुन ठेवावी. याचबरोबर नॅनो युरीयाच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पीक पेरणी परिस्थिती, चारा, पाणी तसेच टंचाई परिस्थितीचाही आढावा घेतला.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देवून सर्व संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 20 टक्के क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्रांताधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, कल्पना निळ-ठुंबे,नितीन सदगीर, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, सामाजिक वनीकरणाच्या रेवती कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर,सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.