नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी 18 वर्षावरील वयोगटासाठी शहरी भाग आणि मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात लसीकरण केंद्रासाठी संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, प्र. निवासी उपजिल्हाधिकारी बबन काकडे,   जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, अधिक लसीकरण होत असलेल्या केंद्रावर आवश्यक लसींचा पुरवठा करण्यात यावा. दररोज उपलब्ध असलेल्या लसींचा आढावा घेण्यात यावा. जिल्हा  शासकीय रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात पथकांची संख्या वाढवावी. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. सूक्ष्म नियोजन करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे.

खाजगी  रुग्णालयांची बैठक घेऊन ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांना आरटीपीसीआर  चाचण्यांसाठी संदर्भित करण्याच्या सूचना द्याव्यात. शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची स्वॅब चाचणी करावी. तालुका स्तरावर आरटीपीसीआर चाचण्यांचा नियमित आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी,  तालुका वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.