नंदुरबार ( प्रतिनिधी) :- कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड (ता. शाहूवाडी ) येथील प्रद्युम्न आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक पदावर बदली झाली आहे. तर नंदुरबारचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांची मुंबई येथे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सरूड (ता. शाहूवाडी ) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या प्रद्युम्न आर. पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरुड येथे तर महाविधालयीन शिक्षण मलकापूर येथे झाले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर १९९५ मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली व विक्रीकर निरीक्षक परिक्षेत यश सपांदन केले. त्यांनतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेतुन १९९८ मध्ये त्यांची तहसिलदारपदी निवड झाली. त्यानंतर १९९९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतुनच त्यांची पोलिस उपअधिक्षक म्हणून निवड झाली.
प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून प्रथम त्यांची जळगाव येथे नेमणूक झाली. प्रशिक्षणाचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर अचलपूर (जि. अमरावती ) येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. अचलपूर बरोबरच त्यांनी पंढरपूर,पुणे ग्रामीण ( राजगुरुनगर) येथेही पोलिस उपअधिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर पुणे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून त्यांनी सेवा बजावली.
पुण्याहुन त्याची नागपूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे पोलिस अधिक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली. त्यांनतर त्यांची कोल्हापूर नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून बदली झाली. गेल्या दोन वर्षापासून ते या पदावर कोल्हापूर येथे कार्यरत होते. तेथे सेवा बजावत असतानाच पाटील यांची भारतीय पोलिस सेवेमध्ये (आय.पी.एस) निवड झाली. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्याकडून ते पदभार स्विकारतील.