नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तळोदा आणि नवापूर तालुक्यात संपर्क साखळी वेळीच खंडीत करण्यासाठी स्वॅब तपासणी वाढविण्यावर आणि आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तिंचे गृह विलगीकरण त्वरीत करण्यावर अधिक भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

कोविड-19 बाबत आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकरी महेश पाटील आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, स्वॅब तपासणीबाबत जनतेच्या मनातील शंका दूर कराव्यात. स्वॅब तपासणीसाठी विरोध असलेल्या भागात त्याच भागातील स्वयंसेवकांची आणि डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. ग्रामीण भागात स्वॅब घेण्यासाठी फिरते पथक नेमण्यात यावे. स्वॅब तपासणी वाढवून बाधित व्यक्तिंवर त्वरीत उपचार करण्यात यावेत, तसेच संपर्कातील व्यक्तिंची सूक्ष्मपणे माहिती घ्यावी. अक्कलकुवा तालुक्यात भविष्यातील गरज लक्षात घेवून वैद्यकीय सुविधांची त्वरीत निर्मिती करावी.

गृह अलगीकरणात असलेल्या बाधित व्यक्तिंची दररोज माहिती घेण्यात यावी. ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात रॅपीड ॲन्टीजन टेस्ट सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन त्वरीत करावे. कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमधील जैववैद्यकीय कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची दक्षता घ्यावी. अधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घ्यावी. बाधित व्यक्तिंच्या नोंदी वेळोवळी अपडेट कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी ताप किंवा अन्य  लक्षणे असलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यास 10 दिवस गृह विलगीकरणात राहण्यास सांगावे व  त्यानंतरही काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागास माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

श्री.गौडा म्हणाले, प्रति लाख चाचणीची संख्या वाढवावी. भाजीपाला विक्रेते आणि दुकानदारांची अँटीजन टेस्ट करून घ्यावी. गृह अलगीकरणाबाबत स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नेमून आवश्यक पाठपुरावा करण्यात यावा. स्वॅब तपासणीची माहिती संबंधितांना त्वरीत देण्यात यावी. त्यांच्या मोबाईलवर एसएमएस येत असल्याने त्यांनी दिलेला क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

स्वॅब तपासणी प्रलंबित असल्याबाबत तालुका स्तरावर दैनंदीन स्वरुपात आढावा घेण्यात यावा व प्रलंबित स्वॅबची माहिती संबंधितांना वेळीच देण्यात यावी, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

बैठकीस उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिकचे मुख्याधिकारी उपस्थित होते.