नंदुरबार(प्रतिनिधी):- जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑफलाइन जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी प्रशासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यातील शिक्षक संघटनांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी झूम मीटिंगद्वारे चर्चेचे आयोजन केले आहे. दिनांक ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या चर्चेत संघटनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती येथे उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.
याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या १५% जिल्हांतर्गत बदल्या शासन निर्णय दिनांक २७/२/२०१७ मधील तरतुदी नुसार ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत शासनाकडून कळविण्यात आलेले आहे. या बदल्यांबाबत संघटनेशी चर्चा करणेकरीता नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १२ : ०० वाजता झुम ऍपद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी संघटनेचे एक प्रतिनिधी यांनी आपल्या तालुक्यातील गशिक्षणाधिकारी यांचेसह पंचायत समिती कार्यालय येथे उपस्थित रहावे. ही व्हीडीओ कॉन्फरन्स केवळ सन २०२०-२१ या वर्षातील जिल्हांतर्गत बदलीबाबतच चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या कॉन्फरन्समध्ये कोवीड १९ प्रार्दुभाव संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.