नंदुरबार ( प्रतिनिधी ) :- शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय? या विद्यार्थी व पालकांच्या मनामधील संभ्रम दूर करून करियर व विविध समस्याबाबत समुपदेशन करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात तीन समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळी सुट्टीचा कालावधी सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत दहावी – बारावी नंतर पुढे काय? शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार ? यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन व्हावे, म्हणून राज्य शासनाने राज्यात सुमारे ४०३ समुपदेशक नेमले आहेत.
विद्यार्थ्यांना हे समुपदेशक
विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांना आवड , क्षमता , कल , अभिरुचीनुसार करिअर निवडीसाठी मदत, मानसिक , भावनिक व शारीरिक समस्यांवर मात करण्साठी समुपदेशन, ताण – तणाव , दुःख , नैराश्य , भीती , आर्थिक विवंचना , असुरक्षितता यावर मात करण्यासाठी योग्य समुपदेशन, इयत्ता दहावी व बारावीनंतर पुढे कोणती शाखा निवडावी , कोणता अभ्यासक्रम तसेच कोर्स निवडावा, कलागुणांना वाव देण्यासाठी , त्यांची बलस्थाने ओळखून सकारात्मक उर्जा निर्माण करण्यासाठी मदत, अभ्यासाबरोबर खेळ, कला, छंद, सकस आहार याचे महत्व सांगून अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रोत्साहन, सामाजिक, कौटूंबिक, भावनिक समस्यांवर मात करण्यासाठी भावनिक आधार, दिव्यांगता, न्यूनगंड, कमतरता, दोष यावर मात करण्यासाठी समुपदेशन, अपयशावर मात करुन जीवन सुकर करण्यासाठी मार्गदर्शन, शालेय मित्र – मैत्रिणी, व्यक्तिगत आरोग्य बाबत येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी योग्य सल्ला, अभ्यास कसा करावा, वेळापत्रक कसे तयार करावे, मन शांती कशी राखावी यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नंदुरबार जिल्ह्यात श्री राजेंद्र सुखदेव माळी, कमला नेहरू कन्या विद्यालय, नंदुरबार (9404749800), श्री. अशोक महाले- माध्य विद्या नवापाडा (9421618130), श्री. वसंतराव बन्सीलाल गुरव, माध्य. आश्रम शाळा, बिजरी
(9421605198) या
तीन समुपदेशकांची नेमणूक केली आहे . नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डाएट) प्राचार्य श्री. जे. एच. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कामकाज सुरू आहे . डाएटच्या मानसशास्त्रीय समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन विभागाचे विभागप्रमुख वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. एस. एन. औटी (मो. क्र. 9405404598) व जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता श्री. पी. एस. जाधव (7875952333) हे यासाठी काम पहात आहेत.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या निर्देशानुसार हे समुपदेशक काम करत आहेत . पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून योग्य त्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य श्री जे. एच. सावंत यांनी केले आहे.
पालक व विद्यार्थ्यांना करियर व शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सध्या योग्य समुपदेशनाची गरज आहे . त्यांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करून शैक्षणिक समुपदेशन करण्यासाठी शासनाने नेमलेले समुपदेशक योग्य दिशा देण्याचे व शैक्षणिक मनोबल वाढविण्याचे काम करत आहेत. – प्राचार्य जे. एच. सावंत