नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात काही शिथीलतेसह लॉकडाऊनच्या कालावधीत 31 जुलै 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी या संदर्भातील आदेश निर्गमित केले असून त्यात मागील सर्व आदेशातील बाबींचाही समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी, कामकाजाचे ठिकाणी आणि बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तित 6 फूटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. दुकानांमध्ये एकावेळी 5 पेक्षा अधिक ग्राहकांना अनुमती राहणार नाही.

मोठे समारंभ किंवा सोहळ्यांना परवानगी राहणार नाही. लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येता येणार नाही. खुली जागा, अवातानुकूलीत सभागृह, लॉन्सच्या ठिकाणी लग्नकार्यास अनुमती असेल. अंत्यसंस्काराच्या ठिकाणीदेखील 50 पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकत्र येऊ नये.  सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास नियमाप्रमाणे दंड करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू किंवा दारूच्या सेवनावर प्रतिबंध राहतील.

कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. तसेच कामकाजाच्या ठिकाणचे नियमित निर्जंतुकीकरण करावे. कार्यालय प्रवेशाच्या आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हँडवॉश आणि सॅनिटायझरचा उपयोग करावा.

जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. मॉल्स आणि व्यापारी संकुलाव्यतिरिक्त इतर दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहतील. ई-कॉमर्स सेवा सुरू ठेवण्यास अनुमती राहील. सद्यस्थितीत सुरू असलेले उद्योग आहे त्याप्रमाणे सुरू राहतील. बांधकाम आणि मान्सूनपूर्व कामे सुरू राहतील. हॉटेल आणि खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी राहील.

टॅक्सी किंवा कॅब, रिक्शा आणि चारचाकी वाहनाला वाहनचालकासह केवळ 2 प्रवाशांना अनुमती राहील. दुचाकीवर केवळ चालकाला प्रवास करण्यास अनुमती असेल. जिल्ह्यांतर्गत बससेवेला 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूकीस अनुमती असेल. अशावेळी शारिरीक अंतर आणि सॅनिटायझेशनच्या सूचनांचे पालन आवश्यक राहील. आंतरजिल्हा वाहतूकीस प्रतिबंध असतील.

प्लंबर, इलेक्ट्रीशिअन, पेस्ट कंट्रोल आदी स्वयंरोजगारांना अनुमती राहील. गॅरेज आणि वर्कशॉपच्या ठिकाणी दिलेल्या वेळेनुसार दुरुस्तीची कामे करता येतील. घराबाहेर व्यायाम करताना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे लागेल. वृत्तपत्र मुद्रण आणि वितरणाला अनुमती राहील. शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामांसाठी (ई कंटेन्ट तयार करणे, निकाल जाहीर करणे, उत्तरपत्रिका तपासणे) शाळा-महाविद्यालयात जाण्याची अनुमती आहे. सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर दिलेल्या अटींचे पालन करून सुरू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.