भाजपच्या गटनेतेपदी कुमुदिनी गावित यांची निवड
नंदुरबार (जगदीश ठाकुर)-
नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी भाजपाने निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे पक्षाची गट नोंदणी केली आहे. भाजपाच्या पक्ष गटनेतेपदी डॉ. कुमिदिनी विजयकुमार गावित यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. भाजपाकडे नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 सदस्यांचे संख्याबळ असून गट नोंदणी वेळी राष्ट्रवादीचे तीन सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता भाजप व राष्ट्रवादीचे गटबंधन झाल असून भाजपाच सदस्य संख्याबळ 26 झाला आहे. पक्ष नोंदणी प्रसंगी भाजपच्या खा. डॉ. हिना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार शरद गावित यांच्यासह भाजपाचे 23 व राष्ट्रवादीचे तीन असे 26 सदस्यांची नोंदणी भाजपाने केली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाला समान 23 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला सात, राष्ट्रवादीला तीन जागा झाले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात रंगलेल्या सत्तासंघर्षाचे नाट्य नंदुरबारातही आता मिनी मंत्रालयासाठी रंगल आहे. असे असले तरी दि.17 जानेवारीपर्यंत नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची मुदत आहे. त्यामुळे आता नंदुरबार जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता स्थापन होईल? याकडे नंदुरबार जिल्ह्यासह राज्याच्या लक्ष लागून आहे.