नंदुरबार (प्रतिनिधी):- महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून 31 मार्च पर्यंत नांदूरबारात पान दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.
कोरोना या विषाणूची लागण झालेल्या इतर भागातून तसेच देशातून अनेक नागरिक प्रवास करुन येत आहेत. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना या विषाणूचा संसर्ग हा खोकला,थूंकी याद्वारे होण्याची शक्यता आहे. पान, गुटखा अथवा त्यासारखे पदार्थ खाऊन नागरिक स्वैरपणे सार्वजनिक ठिकाणी थूंकत असतात. त्यामुळे या विषाणूंचा त्याद्वारे संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने अशा पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील ​पान, गुटखा व यासारख्या पदार्थांची विक्री जेथून होते अशी दुकाने, पान टपरी, पान ठेले 31 मार्च पर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.

..तर 5000 दंड
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबधीत पानटपरी, पानठेला यांना शिक्का मारुन सिल करावे व त्याची चावी संबधीत मालकाकडे सुर्पूद करावी. जर पानटपरी, पानठेला याचे सिल तुटलेले आढळले किंवा पानटपरी उघडी असल्याचे निर्देशनास आल्यास संबंधीताकडून 5000 रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, तसेच आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता 1860(45) च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सांगितले.